---Advertisement---

ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट २१ धोत्रीला नवसंजीवनी, प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात संपन्न

Follow Us:
---Advertisement---

धोत्रि प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या शुभहस्ते वातावरणात संपन्न झाला. ओंकार ग्रुपने हा कारखाना आपल्या समूहात समाविष्ट करून पुन्हा कार्यान्वित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांना या सोहळ्यामुळे महत्त्वपूर्ण सुरुवात झाली आहे. कारखाना सुरू होत असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार आणि कामगारांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमास ओंकार ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तेजस्विनी बरगे, जनरल मॅनेजर श्री. विठ्ठल गायकवाड, तोडणी-वाहतूक ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ओंकार ग्रुपच्या माध्यमातून कारखान्याला नवसंजीवनी

ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील यांच्या नेतृत्वाखाली समूहाने साखर उद्योगात विस्तार करताना बंद पडलेल्या तसेच आर्थिक व प्रशासकीय अडचणींमुळे अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना नवसंजीवनी देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. धोत्री येथील युनिट २१ चे पुन्हा कार्यान्वित होणे हा याच औद्योगिक विस्तारातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.

कारखाना पुन्हा सुरू होत असल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर ऊस गाळपाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीवरील अंतर व खर्च कमी होण्यास मदत होण्याबरोबरच परिसरातील शेतीपूरक व्यवसाय, वाहतूक व्यवस्था आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बंद अथवा अडचणीत असलेल्या कारखान्याला नव्याने उभारी मिळाल्याने परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे.

ओंकार ग्रुपच्या कामकाजात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित, वेळेत ऊसबिल अदा करणे आणि शेतकऱ्यांना योग्य दर देणे या बाबींना प्राधान्य दिले जात असल्याची समूहाची भूमिका आहे. यापूर्वी समूहाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या दरानुसार ऊसबिले अदा करण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी मोफत साखरेसारखे उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

याच शेतकरीहिताच्या दृष्टिकोनातून धोत्री येथील कारखाना ओंकार ग्रुपकडे आल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामात कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होण्यास सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळ्याचे औचित्य साधून कारखान्यातील कर्मचाऱ्यांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले.
परिसराच्या विकासाला मिळणार चालना
साखर कारखाना हा केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसून त्याच्याशी शेतकरी, कामगार, वाहतूकदार, व्यापारी आणि अनेक पूरक व्यवसाय जोडलेले असतात. त्यामुळे धोत्री येथील युनिट २१ पुन्हा कार्यान्वित होणे ही परिसरासाठी आर्थिक व औद्योगिक दृष्टीने महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

ओंकार ग्रुपच्या माध्यमातून या कारखान्याला नवसंजीवनी मिळत असून, शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवून कारखान्याचे कामकाज प्रगतिपथावर नेण्याचा समूहाचा प्रयत्न राहणार आहे. या नव्या सुरुवातीमुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व संबंधित घटकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, धोत्री युनिटच्या प्रगतीसाठी सर्व स्तरांतून सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!