---Advertisement---

सत्तेतून बाहेर पडल्यावर अनेकांची भुतं मानगुटीवर बसणार! – राज ठाकरे

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : भाजपची केंद्रातील सत्ता जाणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावरून पायउतार होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधानपद मिळणार नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार, अशी भाकीतं विरोधकांकडून सातत्याने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या भवितव्याबाबत सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजप आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. सत्तेतून बाहेर फेकल्यानंतर गेल्या १४ वर्षांत जे काही केले, त्या सगळ्याची भुतं त्यांच्या मानगुटीवर बसणार आहेत. याचीच भाजप नेत्यांना भीती वाटत आहे. अर्थात, त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच, असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे भाजपच्या सत्तेच्या भवितव्याबाबत नव्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी भाजपच्या कारभारावरही जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली असून देशातील सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता संपवली आहे, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील जमिनींपासून जंगलांपर्यंत सर्व काही एकाच उद्योगपतीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. राज्यात जे काही दिसेल ते त्या उद्योगपतीला दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपल्यासमोर या घटना घडत असतानाही नागरिकांमध्ये अपेक्षित संताप दिसत नाही, अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. या अन्यायाविरोधात योग्य वेळी राग व्यक्त केला पाहिजे. आता शांत बसून चालणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा नेमका राजकीय संदर्भ काय आणि भाजपच्या भवितव्याबाबत त्यांनी केलेले सूचक भाष्य कोणत्या घडामोडींकडे निर्देश करते, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!