---Advertisement---

शेतात सोन्याचे सात हांडे असल्याची बतावणी; गुप्तधनासाठी अघोरी पूजा !

Follow Us:
---Advertisement---

जालना, वृत्तसंस्था : गुप्तधन मिळवण्याच्या आमिषातून अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात उघडकीस आला आहे. पोखरी गावात रात्रीच्या अंधारात शेतात अघोरी विधी सुरू असताना ग्रामस्थांनी हा प्रकार उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी एका मांत्रिकासह नऊ जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोखरी गावातील एका शेतात सोन्याचे सात हांडे पुरलेले असल्याची बतावणी करण्यात आली होती. हे गुप्तधन मिळवण्यासाठी नऊ जणांनी बुधवारी रात्री शेतात पूजा मांडली होती. रात्रीच्या अंधारात गुप्तधन प्राप्त करण्यासाठी अघोरी विधी सुरू असतानाच या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना मिळाली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हा प्रकार थांबवला आणि पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका मांत्रिकासह नऊ जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपींकडून लिंबू, नारळ, बदाम, सुपारी यांसह पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच एक कार आणि इतर संशयास्पद वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबत परतूरचे पोलीस उपअधीक्षक रोहित कमलदाणे यांनी माहिती दिली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यभरात भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर आता जालना जिल्ह्यातही अशाच प्रकारची घटना समोर आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन आणि भोंदूगिरीविरोधातील कारवाईचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!