नाशिक, वृत्तसंस्था : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन सतर्कअंतर्गत एका संशयित तरुणाकडून तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. गुरुवारी नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर अमृत भारत एक्स्प्रेस (गाडी क्रमांक २२११२) मध्ये आरपीएफ जवान तपासणी करत होते. यावेळी बॅग घेऊन जाणाऱ्या एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जवानांनी त्याला थांबवले.
संदीप बाळासाहेब भामरे असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील रहिवासी आहे. सध्या तो जळगावमधील भवानी पेठ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात तब्बल १ कोटी ४८ लाख ६४ हजार रुपयांची रोकड आढळून आली.
एवढी मोठी रक्कम बाळगण्याबाबत जवानांनी तरुणाकडे विचारणा केली. ही रोकड कुठून आणली, कोणाची आहे आणि ती कुठे नेली जात होती, याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले. मात्र, रोकडीसंदर्भात समाधानकारक माहिती किंवा वैध कागदपत्रे सादर करण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे आरपीएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले असून या रोकडीच्या स्रोताबाबत आणि वाहतुकीच्या उद्देशाबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रेल्वे स्थानकांसह महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे रेल्वे स्थानकांवरील तपासणी मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे.










