बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याचा शस्त्र परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. सुशील कराडविरुद्ध दाखल गुन्हे आणि पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाच्या आदेशानंतर सुशील कराड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बीड पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. या प्रस्तावाची सखोल तपासणी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास मंजुरी दिली. त्यामुळे आता सुशील कराडला शस्त्र बाळगण्याचा अधिकार राहणार नाही.
कंबरेला पिस्तूल लावलेला व्हिडिओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी सुशील कराड याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्याच्या कंबरेला पिस्तूल लावलेले स्पष्टपणे दिसत होते. बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत असतानाच हा व्हिडिओ समोर आल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कारवाई
सुशील कराड याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यासह महिलांना मारहाण करणे, त्यांच्या कुटुंबीयांना धमकावणे, मालमत्ता बळकावणे आणि वाहने ताब्यात घेण्यासंबंधीच्या आरोपांचा समावेश आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर प्रशासनाने शस्त्र परवान्यांची फेरतपासणी मोहीम हाती घेतली. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात ३५० हून अधिक शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे सुशील कराड याच्यावरील कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.










