---Advertisement---

शिरसाटांवर ५ कोटींच्या लाचेचा आरोप; राऊतांची राजीनाम्याची मागणी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लातूरमधील एका सामाजिक कार्यकर्त्याकडे ५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने प्रस्तावित असलेल्या प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ही रक्कम मागितल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा गंभीर आरोप केला. संबंधित सामाजिक कार्यकर्त्याने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर विभागाकडून मंत्र्यांना याबाबत टीप देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. त्यानंतर मंत्र्यांनी लाच घेतल्याशिवाय काम करणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे राऊत म्हणाले.

या प्रकरणावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राज्यातील प्रशासन आणि मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचारात नंबर वन झाले असून, एकीकडे दुष्काळाची होरपळ तर दुसरीकडे भ्रष्टाचाराची होरपळ सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, संजय शिरसाट यांच्यावरील आरोप गंभीर असून, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी आणि शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!