अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ध्यान अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य पौर्णिमा मौन ध्यान शिबिराला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मैंदर्गी रोडवरील भोसले मंगल कार्यालयात पहाटे ५ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर पार पडले. निसर्गाचा समतोल, जलसमृद्धी आणि सर्व जीवांच्या कल्याणाचा व्यापक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याणशेट्टी, अवनी राव, नगरसेवक प्रथमेश कोठे, प्रथमेश इंगळे, पूर्णचंद्र राव, प्रदीप पाटील, अविनाश मडीखांबे, संतोष पराणे, दत्ताकुमार साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
भंडारा, पालघर, अकोला, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, कुर्डुवाडी, सोलापूर, मंगळवेढा, धाराशिव आणि बार्शी येथून भाविक सहभागी झाले होते. शिबिरात लाईव्ह संगीत ध्यान, सामुदायिक नृत्य, ज्ञान व ध्यान, अनुभवांची देवाणघेवाण, ताली योग, ईएफटी तसेच प्रश्नोत्तरे आणि चर्चेची सत्रे झाली. सहभागींसाठी अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सायंकाळी ५ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या संगीत ध्यान सत्रात विशाखापट्टणम येथील कलाकार सहभागी झाले होते. हे सत्र अतिशय लक्षवेधी ठरले. ओंकारेश्वर उटगे, विश्वनाथ देवरमनी, विद्याधर गुरव, मनोज जगताप, दत्ता कटारे, संतोष जवळगी, संतोष वगाले आणि स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
ध्यानसंस्कृतीतून जीवनाला नवी दिशा
धावपळीचे जीवन, वाढता मानसिक ताण आणि दैनंदिन स्पर्धेमुळे माणसाला स्वतःसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अक्कलकोटमध्ये नियमितपणे ध्यान, योग आणि मौन साधनेच्या उपक्रमातून नागरिकांना मानसिक शांतता व आत्मचिंतनाची संधी मिळाली आहे. यामुळे तरुणांमध्ये एकाग्रता, ज्येष्ठांमध्ये सकारात्मकता आणि कुटुंबांमध्ये संवाद वाढविण्यासही मदत होणार आहे.










