अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दुधनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी २५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासह व्यापारी आणि सामाजिक सुविधांचा विस्तार करण्यासाठी विविध विकासकामांचे प्रस्ताव या निवेदनात मांडण्यात आले आहेत.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगराध्यक्षांची बैठक झाली. यावेळी प्रथमेश म्हेत्रे यांनी दुधनी शहराच्या विकासाचा आराखडा सादर केला.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता बोरी नदी ते दुधनीदरम्यान नवीन जलवाहिनी टाकणे आणि जेवर्गी-बबलाद सीमेलगत नवीन विहीर बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शहरात नवीन व्यापारी संकुल आणि सुसज्ज मंगल कार्यालय उभारण्याचा प्रस्तावही दिला आहे.
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व शंकर म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मागणी करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि राज्यातील नगराध्यक्ष उपस्थित होते. या निधीमुळे दुधनीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी व्यक्त केला.










