मुंबई, वृत्तसंस्था : नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीत सण व सुट्ट्या यामुळे नियमित रक्तदात्यांची उपलब्धता कमी होण्याची शक्यता असते. परिणामी रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्यात विशेष स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. यासंदर्भात परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्या आणि रक्त संकलन केंद्रांना पत्र पाठवून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रक्तदान हे अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, तसेच विविध आजारांमुळे नियमित रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये दिवाळी व नाताळच्या सुट्ट्यांमुळे महाविद्यालये, शाळा आणि कार्यालयांमधील नियमित उपक्रमांवर परिणाम होतो. अनेक रक्तदाते सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जात असल्याने रक्तसंकलनाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रक्तपेढ्यांनी सध्या उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याचा आढावा घ्यावा. स्थानिक गरजेनुसार सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्था, स्वयंसेवी संघटना, शैक्षणिक संस्था आणि इतर संघटनांशी संपर्क साधून विशेष स्वैच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईतील शासकीय रक्तकेंद्रांनी रेल्वे स्थानके, विविध कार्यालये आणि गृहनिर्माण संस्था अशा गर्दीच्या ठिकाणी विशेष रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. तसेच रक्तदात्यांपर्यंत पोहोचून त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, असेही परिषदेने सूचित केले आहे. प्रत्येक रक्तकेंद्राने आपल्या परिसरातील रक्ताची मागणी आणि उपलब्ध साठा लक्षात घेऊन रक्तसंकलनाचे नियोजन करणे अपेक्षित आहे.
दरम्यान, राज्यातील रक्तदात्यांनी आपल्या जवळच्या रक्तपेढी किंवा रक्त संकलन केंद्रामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. सामाजिक संस्था आणि विविध संघटनांनीही पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.
रक्तदानाच्या या सामाजिक उपक्रमाला प्रतिसाद देत अनेक संस्था आणि रक्तदाते पुढे येत असून, रक्तदानासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे परिषदेने आभार मानले आहेत. राज्यातील प्रत्येक रुग्णाला गरजेच्या वेळी रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताच्या अभावामुळे कोणत्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये, यासाठी नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.








