नागपूर : वृत्तसंस्था
दि.१३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या प्रक्षेक गॅलरीत बसलेल्यापैकी दोन तरुणांनी खासदार बसलेल्या सभागृहीत उडी मारली आणि स्मोक कँडल फेकले. त्यामुळे तिथे उपस्थित खासदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या घटनेचे पडसाद नागपूर येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनातही उमटले आहेत. विधान भवनातील गॅलरी पास तातडीने बंद करण्यात आले असून परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून सुमारे ११ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागपुरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. विधान भवनाकडे येणाऱ्या मार्गांपैकी सीताबर्डीकडून संविधान चौकाकडे येणारा मार्ग आणि रेल्वे स्थानक-गणेश टेकडीकडून झिरो माइल्स चौकाकडे येणारा मार्गही बंद ठेवण्यात आला आहे. तसेच रेल्वे स्टेशनकडून कस्तूरचंद पार्क मार्गे संविधान चौकात येणारी वाहतूक संविधान चौकातून सदरकडे वळविण्यात आली आहे.
दिल्लीतील घटनेनंतर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी बंदोबस्तात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विधान भवनात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार येण्यापूर्वी नियमाप्रमाणे सुरक्षेची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.