अक्कलकोट, दि.५ : तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्चून लवकरच नवीन बस स्थानक होणार आहे.परंतु या बसस्थानकाचे काम मागच्या
अनेक वर्षापासून सुरू न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आज ७ जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिद्धे यांनी २६ जून रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले होते. त्यानंतर त्यांनी विभाग नियंत्रक व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित दुपारी ३ वाजता ही बैठक लावली आहे. या बैठकीला सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
अक्कलकोट हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे.या ठिकाणी हजारो भाविक परगावाहून येत असतात.या ठिकाणचे बस्थानक भव्यदिव्य असावे आणि तेही प्रवाशांच्या सोयीचे असावे अशी अनेक दिवसांपासून अक्कलकोटकरांची इच्छा होती.त्यामुळे तत्कालीन युती सरकारने नवीन बसस्थानकासाठी अक्कलकोटला
५ कोटी ९० लाख रुपये मंजूर केले होते. परंतु या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात झाली नाही.किरकोळ बाबींमुळे हे काम सुरू होऊ शकले नाही.
या कामाला गती मिळावी यासाठी यापूर्वीही राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत. आता पुन्हा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या बैठकीचे नियोजन केले आहे. या बैठकीचे पत्रही सर्वांना प्राप्त झाल्याची माहिती सिद्धे यांनी दिली.
या बैठकीतून अक्कलकोट बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.