ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजपासून पावसाळी अधिवेशन ; मोठ्या घोषणांची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणूक झाली असून या निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. 27 जूनपासून सुरूवात होत असलेले हे अधिवेशन 12 जुलैपर्यंत चालणार आहे. तसेच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जून रोजी सन 2024 -25 या वर्षाचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दरम्यान, राज्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले असताना हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 3 दिवस कामकाज होणार आहे. तर त्यानंतरचे 2 आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 27 जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दरम्यान, 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात पार पडले होते. या अधिवेशनात एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्यांसाठी लेखानुदान मांडून ते मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे आता या अधिवेशनात 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. यामध्ये महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली होती. लोकसभेतील विजयामुळे विरोधकांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. तर भाजपला कमी जागा मिळाल्या. तसेच महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्याची घोषणा सप्टेंबरच्या मध्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर जनतेतील हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे या अधिवेशनात शेतकरी, महिला, युवक, कामगार तसेच विविध दुर्बल घटकांसाठी योजनांची जंत्री मांडली जाण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!