---Advertisement---

‘नॉट रिचेबल’चा सस्पेन्स संपला; नगरसेविका पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात !

By team
On: January 22, 2026 10:21 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत दिवसभर सुरू असलेला ‘नॉट रिचेबल’चा सस्पेन्स अखेर मध्यरात्री संपुष्टात आला. प्रभाग १५७ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या पुन्हा एकदा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. मध्यरात्री त्या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या असून, आज त्या ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

काल सकाळी शिवसेना भवन येथे आयोजित नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या होत्या. तसेच कोकण भवन येथे पक्षाची गट नोंदणी करण्यासाठी सर्व नगरसेवक उपस्थित असतानाही त्या तेथे पोहोचल्या नव्हत्या. त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याने त्या शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच तिकडे प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मुंबईत ६५ नगरसेवक निवडून आलेल्या ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात होता.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तातडीने मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्यरात्री डॉ. म्हस्के नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्या नेमक्या कोणत्या कारणामुळे संपर्काबाहेर होत्या, याबाबतचे स्पष्टीकरण त्या स्वतः देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी ११ वाजता मिलिंद नार्वेकर यांच्यासमवेत त्या ‘मातोश्री’वर जाणार असून, उद्धव ठाकरे यांच्याशी संवादानंतर कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी रवाना होणार आहेत.

डॉ. सरिता म्हस्के यांचा राजकीय प्रवासही लक्षवेधक राहिला आहे. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, मात्र अवघ्या ४०० मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२५ च्या सुरुवातीला त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाल्या होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात प्रभाग १५७ ची जागा भाजपकडे गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावत शिंदे गटातून बाहेर पडत ‘मातोश्री’वर जाऊन मशाल हाती घेतली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार आकांक्षा शेट्टे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!