---Advertisement---

अक्कलकोटमध्ये प्रभाग ३ मधील बगीच्याचा संघर्ष पेटला ! नगरपालिकेसमोर आमने – सामने उपोषण सुरू

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट येथील जुना किणी रोड वरील स्मशानभूमीच्या शेजारी होणाऱ्या बगीच्याचा वाद पेटला असून या कामासाठी आता दोन गट पडले आहेत. यात एकीकडे बगीच्या हटाव संघर्ष समिती तर दुसरीकडे भाजपतील एका सत्ताधारी नगरसेवकाने गोल्ल समाज पंच कमिटीच्या मदतीने आजपासून उपोषण सुरू केले आहे.

नगरपालिके समोर आमने – सामने हे दोन्ही उपोषण सुरू असल्याने शहरवासीयात या उपोषणाची चर्चा सुरू आहे. बगीच्या हटाव संघर्ष समितीची मागणी हा प्रस्ताव रद्द करावा आणि इतरत्र निधी खर्च करावा अशी आहे तर गोल्ल समाजाकडून ही बगीच्या या ठिकाणीच व्हावी अशी मागणी सुरू केली आहे. हे काम एकूण १ कोटी ५५ लाखाचे असून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे.

यात वॉल कंपाऊंड, वॉचमन कॉर्टर,  ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळ, हायमास्ट यासारख्या विविध सुविधांचा यात समावेश आहे.  या जागेत बाग विकसित झाल्यास आमच्या गरीब वस्तीतील मुलांना खेळण्यासाठी चांगली सोय होईल व वृद्ध माणसांना सायंकाळच्या वेळेस बसण्याची चांगली सोय होईल त्यामुळे ही बगीच्या याच जागेमध्ये व्हावी, असे नगरसेवक जितेश यारोळे यांनी सांगितले. यावेळी तुळजाराम यारोळे, रामचंद्र यारोळे, नागेंद्र यारोळे, सुखदेव चिंचोलीकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हा सगळा प्रकार प्रभाग ३ मधील आहे तर दुसरीकडे ज्या ठिकाणी बगीच्या होणार आहे त्या ठिकाणी सर्व धर्माच्या मृत बालकांचे बे – वारसांचे वयोवृद्ध नागरिकांचे अंत्यसंस्कार झालेले आहेत. त्याला त्या समाजाचा तीव्र विरोध आहे. अशा जागेवर नगरपरिषद बाग तयार करून काय साध्य करणार आहे. मंजूर झालेला निधी हा चक्क वाया जाणार आहे.  वास्तविक पाहता स्मशानभूमीमध्ये बगीच्या करणे अत्यंत चुकीचे आहे. याचा काही फायदा तिथल्या नागरिकांना होणार नाही.

शहरात इतर तारामाता उद्यान,प्रमिला पार्क उद्यान तसेच ए -वन चौकातील उद्यान हे ओसाड व तळीरामांचे अड्डे बनत चालले असताना ते सोडून स्मशानभूमीत नवीन उद्यान बनवणे म्हणजे हास्यास्पद आहे, असे बगीच्या हटाव संघर्ष समितीचे अंकुश चौगुले यांनी सांगितले. यावेळी अविनाश मडीखांबे, विनोद मोरे, अमर शिरसाट, बबलू कामनुरकर, योगेश पवार, सतीश पवार, विकास मोरे आदी उपस्थित होते.

दरम्यान बगीच्याच्या या विषयावरून सध्या नगरपालिकेच्या वर्तुळात वातावरण तापले असून दोघांकडूनही उपोषण सुरू आहे. अद्याप यावर चर्चा अथवा तोडगा निघालेला नाही. आता यावर प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 

★ नियोजनाप्रमाणे कामाला मंजुरी

अक्कलकोट शहर विकास योजनेत अनुक्रमणिका क्रमांक ४ ही खुली जागा म्हणून आरक्षित आहे सदर जागेत नगर परिषदेने बाग विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे त्याची वर्क ऑर्डर दिली आहे. विकास आराखड्याप्रमाणे हे काम मंजूर झालेले आहे. त्यात कुठेही चूक झालेली नाही – सचिन पाटील,मुख्याधिकारी

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!