---Advertisement---

लूटमार करणार्‍या दोघांना दोन पिस्टलसह सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले

By team
On: June 3, 2025 10:17 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-बार्शी रोडवर कारंबा येथे लूटमारीच्या उद्देशाने चारचाकी गाडीत थांबलेल्या दोघांना दोन पिस्टलसह सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चैतन्य ऊर्फ भैया पांडुरंग शेळके (रा. भोत्रा, ता. परांडा, जि. धाराशिव) व करण शिवाजी भोसले (रा. खांडवी, ता. बार्शी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आठ गुन्हे उघडकीस आणले. 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यातील एक सराईत गुन्हेगार सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांतून तडीपार आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना अडवून लूटमार करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी पथके केली होती. सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस हवालदार सागर ढोरे-पाटील, अक्षय डोंगरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली. सराईत गुन्हेगार चैतन्य ऊर्फ भैया पांडुरंग शेळके (रा. भोत्रा, ता. परांडा, जि. धाराशिव) व करण शिवाजी भोसले (रा. खांडवी, ता. बार्शी) हे चारचाकी गाडी क्र. एम. एच. 14 जी.ए. 4210 मधून पिस्टस्लसह बार्शीहून सोलापूरला येत असल्याचे कळाले.

पोलिसांच्या पथकास सोलापूर-बार्शी रोडवरील कारंबा गावच्या पुढे नमूद वाहन रोडच्या कडेला एका झाडाखाली उभे असलेले दिसले. वाहनातील इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे मिळाली. त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चार जबरी चोरीचे, तीन वाहन चोरी व एक आर्म अ‍ॅक्ट असे आठ गुन्हे उघडकीस आले. तसेच दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे, 58 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन कार, तीन मोटारसायकल, तीन मोबाईल फोन असा एकूण 12 लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यातील चैतन्य पांडुरंग शेळके हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याला काही महिन्यांपूर्वी धाराशिव व सोलापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरे-पाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, समीर शेख, मोहोळ पोलीस ठाण्याचे अंमलदार दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्निल कुबेर यांनी पार पाडली. ते ज्या चारचाकी वाहनातून आले होते ते चोरीचे होते. तसेच त्यांना पिस्टल विकणार्‍या मारुती नागनाथ माने (रा. सुकटा, जि. धाराशिव) याला अटक केली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!