ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुःखावर दुःख : अजित पवारांच्या निधनानंतर ज्येष्ठ कार्यकर्त्याचा मृत्यू !

नाशिक : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. या धक्कादायक घटनेचा परिणाम इतका तीव्र होता की, त्यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्ते सुदाम कारभारी बोडके (वय ६३, रा. ढकांबे, ता. दिंडोरी) यांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

या दुहेरी दुःखद घटनेमुळे दिंडोरी तालुक्यासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुदाम बोडके हे एका नातेवाईकाच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याच वेळी अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी त्यांना समजली. ही बातमी ऐकताच ते अत्यंत भावुक झाले. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवार यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि दादांप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली.

यानंतर अस्वस्थ मनःस्थितीत सुदाम बोडके हे दुचाकीवरून नाशिककडे रवाना झाले. नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात पोहोचताच त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती खालावत असल्याने त्यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि ते अचानक कोसळले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक होते आणि पक्षाच्या स्थानिक पातळीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय होते. ढकांबे गाव व दिंडोरी तालुक्यातील विविध विकासकामांत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने ढकांबे गावासह संपूर्ण दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!