---Advertisement---

सोलापूर महापौरपदासाठी भाजपचा अर्ज आज; नावावर सस्पेन्स कायम

By team
On: February 2, 2026 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत नामनिर्देशनासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात एकूण १०२ नगरसेवकांपैकी भाजपचे तब्बल ८७ नगरसेवक असल्याने भाजपचाच महापौर बिनविरोध होणार, हे निश्चित आहे. मात्र महापौरपदासाठी नेमके कुणाचे नाव पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापौर पदासाठी कोठे व देशमुख या दोन गटांकडून आपापल्या उमेदवारांसाठी आग्रही भूमिका घेतली जात होती. मात्र पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी भाजपने व्हीप जारी केला असून, पक्षाची परवानगी न घेता कोणालाही सूचक किंवा अनुमोदक होऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

कोठे गटाकडून विनायक कोंड्याल तर देशमुख गटाकडून किरण देशमुख यांची नावे आतापर्यंत चर्चेत होती. मात्र अलीकडेच निष्ठावंत नरेंद्र काळे यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचे नावही चर्चेत आले आहे.

विनायक कोंड्याल हे आमदार कोठे यांचे भाऊजी असून ते निवडणुकीपूर्वीच भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे आयारामांना संधी द्यावी का, यावर पक्षात मतभेद आहेत. तर किरण देशमुख यांना उमेदवारी दिल्यास घराणेशाहीचा आरोप होण्याची आणि पुन्हा गटबाजी उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही गटाशी थेट संबंध नसलेल्या रंजिता चाकोते यांचे नाव पुढे येत आहे. त्या महिलाआघाडीच्या शहराध्यक्षा असून रोहिणी तडवळकर यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. गेल्या दहा वर्षांपासून महापौरपदी महिला असल्याने यंदाही महिलेलाच संधी द्यावी, असा मतप्रवाह पक्षात आहे.

विशेष म्हणजे महापौरपदाचा उमेदवार नगरसेवकांना न विचारताच थेट प्रदेश भाजपकडून जाहीर केला जाणार असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत नगरसेवकांच्या दोन बैठका झाल्या असल्या तरी उमेदवाराबाबत त्यांचे मत विचारण्यात आलेले नाही. या सर्व प्रक्रियेचे अंतिम निर्णयाधिकार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोपविण्यात आले असून ते कोणाचे नाव पुढे करतात, यावर सोलापूरच्या नव्या महापौराचे भवितव्य ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!