पुणे : वृत्तसंस्था
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी शंका उपस्थित होत असतानाच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID)ने गुरुवारी अधिकृत स्पष्टीकरण दिले. “विमान अपघाताचा तांत्रिक तपास हा वेगळा भाग असून CID चा तपास आकस्मिक मृत्यूच्या अनुषंगाने सुरू आहे,” अशी माहिती CIDचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रकरणी रोहित पवार यांनी डीजीसीएविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तपासाच्या प्रगतीबाबत माहिती जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वाढलेल्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर CIDने पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. पोलीस अधीक्षक (गुन्हे पथक) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे सांगत रामानंद यांनी तपासाचे तीन मुख्य मुद्दे स्पष्ट केले:
-
या दुर्घटनेमागे कट किंवा घातपात आहे का?
-
गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा झाला आहे का?
-
कोणतेही गुन्हेगारी कृत्य घडले आहे का?
या पैकी कोणताही मुद्दा तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास पूर्ण केला जाईल आणि न्यायालयात खटला चालवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विमान दुर्घटनेचा तांत्रिक तपास Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) मार्फत केला जात असून त्याचा व्याप वेगळा आहे. AAIBचा अहवाल CIDच्या तपासात जोडला जाणार असल्याची माहिती रामानंद यांनी दिली.
“केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक अहवाल मागवले गेले आहेत. तपास समाधानकारक आणि योग्य वेगाने सुरू आहे,” असा दावा CIDकडून करण्यात आला.दरम्यान, VSR कंपनीच्या संभाव्य निष्काळजीपणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर रामानंद यांनी थेट भाष्य टाळले. या संपूर्ण प्रकरणात CIDचा अहवाल आणि AAIBच्या निष्कर्षांनंतरच पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.