---Advertisement---

मुंबई विधिमंडळात शाब्दिक खडाजंगी; ‘बाप’ उल्लेखावरून कल्याणशेट्टी–जाधव आमनेसामने

By team
On: March 4, 2026 3:22 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी विधिमंडळ परिसरात दोन आमदारांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानसभा इमारतीच्या पोर्चमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना घडली. सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध राजकीय मुद्द्यांमुळे आधीच गाजत असताना हा नवा वाद समोर आल्याने चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. सभागृहातील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने वातावरण अधिकच तापले.

माहितीनुसार, विधानसभा सदस्य राहुल आवाडे यांची कन्या सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय यांच्या विवाहसोहळ्याच्या पत्रिका आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून विधिमंडळ परिसरात वितरित केल्या जात होत्या. एकाच ठिकाणी सर्व सदस्य उपस्थित असल्याने सोयीसाठी हे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. याच मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करताना भास्कर जाधव यांनी विधिमंडळ परिसरात अशा प्रकारे पत्रिका वाटणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. या चर्चेदरम्यान त्यांच्या वक्तव्यात ‘सरकारचा बाप’ असा उल्लेख झाल्याचा आरोप सचिन कल्याणशेट्टी यांनी केला.

हा शब्दप्रयोग ऐकताच कल्याणशेट्टी यांनी जाधव यांना जाब विचारत, “तुम्ही बाप काढलाय, तुम्हाला तो अधिकार आहे का? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात. तुम्ही बाप काढला तर मीही काढेल,” असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले. त्यावर जाधव यांनीही “तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा,” असे प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जाते. काही काळ दोन्ही आमदारांमध्ये शाब्दिक देवाणघेवाण सुरू राहिली. उपस्थित सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले की, “भास्कर जाधव कर्मचारी वर्गावर नाराजी व्यक्त करत होते. मी सभागृहात प्रवेश करत असताना सरकारचा बाप असा उल्लेख माझ्या कानावर पडला. काही हरकत असेल तर अधिकृत तक्रार करावी; मात्र अशा शब्दांचा वापर योग्य नाही.” विधिमंडळ हे कुटुंबासारखे असून लग्नपत्रिका देणे ही परंपरा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्यामुळे जाधव नाराज असावेत, अशी टीकाही त्यांनी केली.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेले असताना या नव्या वादामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी कामकाजात या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!