---Advertisement---

राज्यातील महिला परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ !

By team
On: March 19, 2026 11:28 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा घटक असलेल्या अंशकालीन महिला परिचरांना मोठा दिलासा देणारा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली असून १ एप्रिल २०२६ पासून त्यांना ६ हजार रुपये मानधन मिळणार आहे.

राज्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या या महिला परिचर गावपातळीवर, विशेषतः आदिवासी, दुर्गम आणि डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी, जनजागृती आणि कुटुंबांपर्यंत सेवा पोहोचविण्याचे काम त्या सातत्याने करत असतात.

यापूर्वी २०१९ च्या शासन निर्णयानुसार या महिला परिचरांना दरमहा ३ हजार रुपये मानधन दिले जात होते. मात्र वाढती महागाई, बदलते कामाचे स्वरूप आणि वाढती जबाबदारी लक्षात घेता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व विविध संघटनांकडून सातत्याने करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेत त्यांच्या मानधनात ३ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यमान ३ हजार आणि वाढीव ३ हजार असे एकूण ६ हजार रुपये मासिक मानधन १ एप्रिल २०२६ पासून देण्यात येणार आहे.

दरम्यान, सर्व जिल्हा परिषदांना सुधारित मानधन देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रचलित कार्यपद्धतीनुसार दरमहा १० तारखेपर्यंत मानधन अदा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील अंशकालीन महिला परिचरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांच्या कामाला मिळालेल्या या मान्यतेचे स्वागत केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!