---Advertisement---

स्वामी समर्थांवरील कादंबरी भक्तांच्या श्रद्धेला नवी दिशा देणार

By team
On: November 5, 2026 3:29 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांच्या दिव्य जीवनप्रवासाचा, अलौकिक लीलांचा आणि अमृततुल्य उपदेशाचा अनमोल ठेवा उलगडणारी स्वामी समर्थांवरील कादंबरी स्वामीभक्तांच्या श्रद्धेला नवी दिशा देणार आहे, असे प्रतिपादन विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष तथा गुरु मंदिरचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले. बुधवारी, श्री गुरू मंदिर येथे प्रेम धांडे लिखित ‘अक्कलकोटचे स्वामी ब्रह्मांडनायक’ या बहुखंडी कादंबरीच्या पहिल्या खंडाच्या प्रकाशन डॉ. राजीमवाले यांच्या हस्ते
करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित या कादंबरीत महाराजांचे कर्दळीवनातून प्रकट होण्यापासून ते भारतभ्रमण करीत अक्कलकोट येथे आगमन होईपर्यंतचा दिव्य प्रवास लेखक
प्रेम धांडे यांनी साहित्यिक शैलीत शब्दबद्ध केला आहे. केवळ स्वामी महाराजांचे चरित्र आणि त्यांच्या अलौकिक लीलांचे वर्णन एवढ्यापुरतीच ही कादंबरी मर्यादित नसून, त्यांच्या जीवनातील प्रसंग, विचार आणि अनमोल उपदेश यांचाही वेध यात घेण्यात आला आहे. त्यामुळे स्वामीभक्तांना महाराजांच्या आध्यात्मिक विचारांची आणि जीवनकार्याची ओळख करून देणारी ही कादंबरी निश्चितच वाचनीय ठरणार आहे, असे ते म्हणाले. ही कादंबरी बहुखंडी असल्याने टप्प्याटप्प्याने श्री स्वामी समर्थांचा आध्यात्मिक प्रवास वाचकांसमोर येणार आहे. तो निश्चितच स्वामी भक्तांना आवडेल असा विश्वास, लेखक धांडे यांनी व्यक्त केला.

या प्रकाशन सोहळ्याला विद्याधर पारखे, जितेंद्र जाजू, नितीन शिंदे यांच्यासह गुरु मंदिरचे पुजारी, कर्मचारी, सेवेकरी आणि असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित या साहित्यकृतीच्या प्रकाशनामुळे उपस्थित भक्तांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!