---Advertisement---

गोकुळच्या सत्तासंघर्षात राज ठाकरेंची उडी; सतेज पाटलांना पाठिंबा!

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर, वृत्तसंस्था : गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालक नेमण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे.

गोकुळच्या निवडणुकीत भाजप पॅनलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनलचे १३ संचालक निवडून आले. मात्र, त्यानंतर सरकारने पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. यावर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे म्हणाले की, गोकुळमध्ये भाजपला सत्ता मिळवता आली नाही म्हणून सरकारचे पाच संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार का दिला जात आहे? लोकशाहीची बूज राखायची असेल, तर निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य केला पाहिजे.

भाजप हा अजब पक्ष असून सत्तेत राहून विरोधकांविरोधात मोर्चे काढतो, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाही वाचवण्याच्या घोषणा देणारेच लोकशाहीचा गळा आवळत असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भाजपमध्ये समजूतदारपणाचा दुष्काळ असल्याचे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

दरम्यान, सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने न्यायालयात जाण्याची तयारी केली असून जनतेच्या न्यायालयातही हा मुद्दा मांडण्याची रणनीती आखली आहे. अशातच राज ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने गोकुळमधील सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण मिळाले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!