---Advertisement---

UPSC, KBC अन् ट्रॅव्हल व्यवसायात अपयश; अखेर ज्वेलर्समध्ये केली चोरी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था : यूपीएससी परीक्षेची तयारी, प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’मधील सहभाग आणि ट्रॅव्हल व्यवसायात झालेले नुकसान… या सगळ्या घटनांनंतर एका सुशिक्षित तरुणाने चोरीचा मार्ग निवडल्याचा प्रकार समोर आला आहे. कांदिवली पश्चिम येथील ज्वेलर्सच्या दुकानातून सुमारे पाच लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरणाऱ्या कॉम्प्युटर सायन्स पदवीधराला कांदिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. सतीश कुमार कृष्णप्रसाद केसरी (वय ४२) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे.

सतीश हा कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पदवीधर आहे. रोजगाराच्या शोधात तो दिल्लीला आला होता. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने नोकरी सांभाळत यूपीएससी परीक्षेची तयारी केली; मात्र त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमातही सहभाग घेतला. मात्र, तो फास्टेस्ट फिंगर फर्स्ट फेरीपर्यंतच पोहोचू शकला. पुढे पत्नीच्या मदतीने त्याने टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. यासाठी कर्ज काढून चार ते पाच चारचाकी वाहने खरेदी केली आणि ती ओला व उबर या कंपन्यांशी जोडली. मात्र, व्यवसायात नुकसान झाल्याने त्याच्यावर मोठे कर्ज झाले.

कर्जाची परतफेड करणे कठीण झाल्यानंतर त्याने ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये चोरी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. ग्राहक बनून दुकानात जायचे, दागिने पाहण्याच्या बहाण्याने हातात घ्यायचे आणि संधी मिळताच पळून जायचे, अशी त्याची पद्धत होती. याच पद्धतीने १५ नोव्हेंबर रोजी कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवरील पद्मावती ज्वेलर्समध्ये त्याने चोरी केली. दुकानात ग्राहक म्हणून गेलेल्या सतीशने ४३.२ ग्रॅम वजनाची आणि सुमारे पाच लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी पाहण्यासाठी मागितली आणि संधी साधून पसार झाला.

चोरीनंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने मुंबईतील एका वसतिगृहात बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्राच्या आधारे वास्तव्य केले. तसेच मोबाईल फोन बंद करून तो दिल्लीला निघून गेला. कांदिवली पोलिसांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने त्याचा माग काढला. अखेर पोलिसांच्या पथकाने दिल्लीत छापा टाकून त्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची सोन्याची साखळीही जप्त करण्यात आली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दिंडोशी परिसरातही अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. सध्या तो पोलीस कोठडीत असून, कांदिवली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!