भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टन येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकांची दोन गटांत विभागणी होणार आहे. १९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी ही योजना आखण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक साईराज बहुतुले एकदिवसीय संघासोबत राहतील, तर मॉर्न मॉर्केल आणि फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक कसोटी संघाच्या तयारीसाठी वेलिंग्टनला रवाना होतील.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सितांशु कोटक यांनी ही माहिती दिली. २०२७ च्या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने गंभीर एकदिवसीय संघासोबत राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रशिक्षकांच्या विभागणीबाबतचा अंतिम निर्णय गौतम गंभीरच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. खेळाडूंची तंदुरुस्ती, कामाचा ताण आणि सराव यांचा विचार करून कसोटी मालिकेची तयारी केली जाणार आहे.
भारताने तिसरा सामना जिंकून एकदिवसीय मालिका खिशात घातल्यास पाच खेळाडू कसोटी संघात दाखल होण्याची शक्यता आहे. शुभमन गिल, अंशुल कंबोज, लोकेश राहुल, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे खेळाडू मॉर्न मॉर्केल आणि सितांशु कोटक यांच्यासोबत कसोटी संघाच्या तयारीत सहभागी होऊ शकतात.
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकण्यासाठी भारताला दोन्ही सामने जिंकणे आवश्यक असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. भारताने न्यूझीलंडच्या भूमीवर अखेरची कसोटी मालिका २००९ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्यामुळे आगामी मालिकेत भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.










