---Advertisement---

‘मोदी समोर आले की नजर चुकवतात’; सोनिया गांधींचा पुस्तकातून दावा

Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र सध्या चर्चेत आहे. या पुस्तकातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मर्यादित संपर्काबाबत भाष्य केले आहे. मोदी समोर आले की नजर चुकवतात, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, मोदी यांच्यावर टीका करतानाच त्यांच्या राजकीय प्रवासातील काही पैलूंचे कौतुकही त्यांनी केले आहे. याशिवाय आणीबाणीच्या निर्णयाबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

सोनिया गांधी यांनी पुस्तकात म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा फारसा वैयक्तिक संपर्क नाही. संसदेतील अध्यक्षांच्या दालनासारख्या औपचारिक कार्यक्रमांमध्ये अधूनमधून भेट होते. समोरासमोर आल्यावर दोघेही औपचारिकपणे नमस्कार करतात. मात्र, पूर्वी वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांशी सहजपणे संवाद साधत असत. आता मात्र नेते एकमेकांची नजर टाळण्याचा प्रयत्न करतात. नरेंद्र मोदी समोर आल्यावर दुसरीकडे पाहतात, असे सोनिया गांधी यांनी नमूद केले आहे.

मोदी आणि आपल्यातील राजकीय संघर्ष हा वैयक्तिक नसून भारताच्या दोन वेगवेगळ्या संकल्पनांमधील संघर्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी त्यांच्या भारताच्या संकल्पनेसाठी लढत होते, तर आपण वर्चस्ववादाला विरोध करणाऱ्या, सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाला महत्त्व देणाऱ्या भारतासाठी लढत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाबाबतही सोनिया गांधी यांनी भाष्य केले आहे. मोदी सामान्य पार्श्वभूमीतून पुढे आले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले, असे त्यांनी नमूद केले. दिल्लीतील राजकीय चर्चांमध्ये व्यक्त होणारी मते अनेकदा देशातील सामान्य जनतेच्या वास्तवापासून दूर असल्याचे आपल्याला जाणवत असे, असेही त्यांनी पुस्तकात लिहिले आहे.

दरम्यान, १९७५ ते १९७७ या काळातील आणीबाणीच्या निर्णयावरही सोनिया गांधी यांनी आत्मपरीक्षण केले आहे. देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय चुकीचा होता, हे त्यांनी मान्य केले आहे. त्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची गंभीरता लक्षात आल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आपल्या निर्णयाबाबत खंत वाटली असावी, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्यामुळे या पुस्तकातील राजकीय आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!