---Advertisement---

नक्षलवाद संपला, आदिवासी भागांत विकासाचे नवे पर्व; मोदींची गडचिरोलीतून घोषणा

Follow Us:
---Advertisement---

गडचिरोली : देशातील नक्षलवाद आणि माओवादाचे कंबरडे मोडले असून, नक्षलवाद देशातून संपुष्टात आल्याचे मोठे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित विशेष कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना त्यांनी नक्षलवादाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच देशातील ५० कोटी नागरिक गरिबीच्या रेषेतून बाहेर आल्याचा दावाही त्यांनी जागतिक बँकेच्या अहवालाचा संदर्भ देत केला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा देत पंतप्रधान मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. त्यांचे ‘उलगुलान’ हे आंदोलन आजही देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी परकीय व्यक्तींच्या नावाने दिवस साजरे केले जात होते; मात्र आता देशातील महान व्यक्तिमत्त्वांच्या योगदानाचा गौरव केला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी अरुणाचल प्रदेश, मिझोरम, महाराष्ट्रासह देशातील विविध आदिवासीबहुल भागांमध्ये विकासकामांचे लोकार्पण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या १२ वर्षांत आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकारने अनेक परिणामकारक योजना राबवल्या असून, चार कोटी पक्की घरे बांधण्यात आली आहेत. आदिवासींचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना राबवून त्यांच्या प्रगतीची दारे खुली केली असल्याचे मोदी म्हणाले.

‘१२५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव होता’

देशातील सुमारे १२५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी आपले हातपाय पसरले होते. आदिवासी समाज नक्षलवादाच्या विळख्यात अडकलेला असताना तत्कालीन सरकारांनी मौन बाळगले, असा आरोप करत मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. नक्षलवादी चळवळीत अल्पवयीन मुलांना ओढले जात होते. मात्र, आता नक्षलवादाचे कंबरडे मोडल्याने आदिवासी माता-भगिनींकडून सरकारला आशीर्वाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील हे सर्वांत मोठे यश असल्याचेही त्यांनी म्हटले.

यंदा बस्तरमध्ये दिवाळी साजरी केल्याचा उल्लेख करत मोदी यांनी नक्षलवादमुक्त भागांमध्ये विकासाची नवी सुरुवात होत असल्याचे सांगितले. नक्षलवादामुळे गडचिरोलीसह अनेक आदिवासीबहुल जिल्ह्यांचे मोठे नुकसान झाले. आता या भागांमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे नवे पर्व सुरू होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीत मान्यवरांची उपस्थिती

जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित विशेष कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम, केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे आदिवासी विकास मंत्री, जिल्ह्यातील आमदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेत आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विकास योजनांची माहिती दिली.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!