नागपूर वृत्तसंस्था : वाढदिवसाच्या आनंदोत्सवाला दारूची पार्टी आणि रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार झाल्याने रक्तरंजित वळण लागल्याची धक्कादायक घटना नागपुरातील मानेवाडा परिसरातील अध्यापक नगरात घडली. दारूच्या नशेत असलेल्या एका डीजे व्यावसायिकाने बेकायदा रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. यामध्ये त्याच्याकडे काम करणाऱ्या अवघ्या १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. अर्जुन सुनील लाडसे असे जखमी मुलाचे नाव असून, त्याच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शैलेश हिरामण गुल्हाने असे गोळीबार करणाऱ्या डीजे व्यावसायिकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा परिसरात वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर काही तरुणांनी दारूची पार्टी केली. यावेळी महाल्ले सभागृहाजवळ काही तरुण एकत्र बसून गप्पा मारत होते. त्यांच्यामध्ये शैलेश गुल्हाने आणि अर्जुन लाडसे यांचाही समावेश होता. शैलेश हा डीजे व्यावसायिक असून अर्जुन त्याच्याकडे कामाला होता. विशेष म्हणजे अर्जुन अकरावीच्या वर्गात शिक्षणही घेत आहे.
गप्पा मारताना अर्जुनने वर्गातील काही मुले त्याला त्रास देत असल्याचे शैलेशला सांगितले. त्यावर शैलेशने त्याला घाबरण्याची गरज नसल्याचे सांगत आपल्याकडे शस्त्र असल्याचा रुबाब दाखवला. त्यानंतर दारूच्या नशेत असलेला शैलेश घरात गेला आणि रिव्हॉल्व्हर घेऊन बाहेर आला. उपस्थित तरुणांसमोर त्याने हवेत एक गोळी झाडली. त्यानंतर दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला गोळी सुटली नाही.
रिव्हॉल्व्हर अर्जुनच्या दिशेने रोखले अन् अनर्थ घडला!
यानंतर शैलेशने रिव्हॉल्व्हरची मॅगझिन काढली आणि शस्त्र अर्जुनच्या दिशेने रोखले. मात्र, पुढच्याच क्षणी ट्रिगर दाबला गेला आणि रिव्हॉल्व्हरमधून सुटलेली गोळी थेट अर्जुनच्या डोक्यात घुसली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित तरुणांमध्ये एकच घबराट पसरली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्जुनला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चार आणि हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या शैलेश गुल्हाने याच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य तरुणांनाही ताब्यात घेतले आहे. रिव्हॉल्व्हरमध्ये आधीपासून गोळ्या लोड असल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमका गोळीबार कशा परिस्थितीत झाला, शस्त्र हाताळताना कोणती चूक झाली आणि गोळी कशी सुटली, याचा तपास पोलीस करत आहेत.
वाढदिवसाच्या आनंदासाठी सुरू झालेली पार्टी एका निष्पाप अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतण्याची वेळ आल्याने या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.










