सोलापूर, प्रतिनिधी : संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला असून, माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे उमेदवार शहाजीराजे देशमुख यांचा पराभव केला.
मतमोजणीत अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना ८३ मते, तर शहाजीराजे देशमुख यांना ३३ मते मिळाली. तब्बल ५० मतांच्या फरकाने मोहिते पाटील यांनी विजय मिळवत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील पहिल्या निकालात बाजी मारली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक-दोन जागा वगळता इतर सर्व जागा आमच्या पॅनलच्या निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, पहिल्याच निकालात स्वाभिमानी शेतकरी पॅनलने विजय मिळवल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पहिल्या निकालाने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली असून, पुढील निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









