---Advertisement---

रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार; आरोपी चालत येऊन फायरिंग करून फरार

By team
On: February 1, 2026 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील इमारतीबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहिला, त्याने गोळीबार केला आणि नंतर घटनास्थळावरून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहत चार ते पाच राऊंड फायरिंग करताना दिसत आहे. या घटनेत आरोपीसोबत अन्य कोणी होते का, याचाही तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात एकच आरोपी या गोळीबारात सहभागी असल्याचे समोर आले आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी एकटाच बाइकवरून जुहू परिसरात आला होता. रोहित शेट्टी यांच्या घरापासून काही अंतरावर त्याने बाइक उभी केली आणि त्यानंतर तो चालत इमारतीसमोर गेला. गोळीबार केल्यानंतर तो पुन्हा बाइकवरून घटनास्थळावरून फरार झाला.

रविवारी पहाटे ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेनंतर इमारतीबाहेर तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटना घडली तेव्हा रोहित शेट्टी घरी उपस्थित होते की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या गोळीबाराची कार्यपद्धती (मोडस ऑपरेंडी) अभिनेता सलमान खान यांच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणाशी मिळतीजुळती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात बिश्नोई गँगचा सहभाग असण्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे.

घटनेनंतर विभागीय पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तपास करत असून इमारतीभोवतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या गोळीबारामागील नेमके कारण व आरोपींची ओळख स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!