नागपूर : प्रतिनिधी
नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी यशवंत स्टेडियम परिसरात एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील SRA प्रकल्पातील गैरव्यवहारांना न्याय मिळत नसल्याच्या आरोपांवरून येथे आंदोलनासाठी आलेल्या सीताबाई धांडे यांनी दुपारच्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्न केला. परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त असतानाच हा प्रकार घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्रत्य्यक्षदर्शींनुसार, धांडे यांनी अचानक ज्वलनशील पदार्थ स्वतःवर ओतून अंगाला आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना पकडून सुरक्षित स्थळी नेल्याने अनर्थ टळला.
ही घटना पुण्यातील खराडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन (SRA) प्रकल्पाशी संबंधित आहे. आंदोलकांचा आरोप आहे की या प्रकल्पासाठी बोगस संमतीपत्रांचा वापर करण्यात आला असून स्थानिकांना हक्कांपासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आंदोलकांनी सांगितले की, 23 एप्रिल 2025 रोजी या वसाहतीत लागलेल्या भीषण आगीत 100 झोपड्या जळून खाक झाल्या आणि दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही आग नैसर्गिक नसून विकासकामाशी संबंधित बिल्डरने लावल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र, इतक्या गंभीर घटनेनंतरही आरोपी बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदवला नसल्याने रहिवासी संतप्त आहेत. न्याय मिळत नसल्यानेच नागपूर अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे आंदोलकांनी सांगितले. आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.