---Advertisement---

सोलापूर महापालिका निवडणुकीआधीच भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत

By team
On: December 27, 2025 9:59 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण झाला असून, पक्षातील ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत पक्षशिस्तीला थेट आव्हान दिले आहे.

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेली, तर ते ज्या पक्षातून निवडणूक लढवतील त्या पक्षाचा प्रचार करू, असा थेट इशारा या दोन्ही आमदारांनी दिल्याने भाजपसह महायुतीच्या गोटात खळबळ उडाली आहे.

निवडणूक प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश केलेले लोक आज भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत आहेत, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. भाजपमध्ये उमेदवाराची आर्थिक क्षमता किंवा निवडणुकीत किती खर्च करणार, असे प्रश्न कधी विचारले जात नव्हते. मात्र, सध्या मुलाखतींमध्ये याच मुद्द्यांना प्राधान्य दिले जात असून, त्यामुळे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते डावलले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्थानिक निवडणूक समिती व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली. निवडणूक समितीत नेमके कोण सदस्य आहेत, याची माहितीही आम्हाला नाही. जागांच्या वाटाघाटी केवळ पालकमंत्रीच करत असून, कोणाशी चर्चा करावी हेच स्पष्ट नसल्यामुळे आम्ही संपूर्ण प्रक्रियेपासून दूर राहिलो आहोत, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही आमदारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला, तर ते कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. भाजपमधील दोन बड्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सोलापूर महापालिका निवडणुकीआधीच पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, बंडखोरी झाल्यास भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!