---Advertisement---

भाजपची १ कोटींची ऑफर असली तरी महापौर काँग्रेसचाच; वडेट्टीवारांचा ठाम दावा !

By team
On: January 24, 2026 5:34 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

भाजपकडून नगरसेवकांना पदासोबत प्रत्येकी एक कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी (दि. २४) केला. दोन्ही बाजूंनी संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अखेर नागपूरचा महापौर काँग्रेसचाच होईल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, उबाठा, वंचित आणि दोन अपक्ष नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र आपण हायकमांडचा आदेश पाळणार असून काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माझ्यासाठी कुठलेही पद किंवा सत्ता महत्त्वाची नाही, तर काँग्रेस पक्ष महत्त्वाचा आहे,” असेही ते म्हणाले.

वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांची प्रभारी रमेश चेन्निथला, सहप्रभारी कुणाल चौधरी आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत झूमद्वारे बैठक झाली. यावेळी नागपूर महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

काँग्रेसचे २७ आणि पप्पू देशमुख यांच्यासह ३ असे एकूण ३० सदस्यांचे संख्याबळ असून बहुमतासाठी आणखी चार सदस्यांची आवश्यकता असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. ही जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासोबतच स्थायी समिती आपल्या गटालाच मिळणार असल्याचा दावा करत महापौर पदासाठी खासदार धानोरकर यांचा अट्टाहास असल्याचा आरोपही त्यांनी केला. शुक्रवारी कार्यालयीन वेळेनंतर विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करताना कुणाचा तरी फोन आला असल्याचा आरोप करण्यात येत असला तरी त्याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याने आपण यावर भाष्य करणार नसल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांना क्लिनचीट मिळाल्याबाबत विचारले असता, भाजपकडे मोठे ‘वॉशिंग मशीन’ असल्याची खोचक टीका वडेट्टीवार यांनी केली. याच प्रकरणात भुजबळ यांना तुरुंगात जावे लागले, त्याची भरपाई कशी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!