---Advertisement---

कोटा कमी, आवक घटण्याची शक्यता; साखरेच्या दरांना आधार

By team
On: January 31, 2026 7:30 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा जाहीर केला असून, मागणीच्या तुलनेत कोटा अपुरा ठरल्याने साखरेच्या दरांत वाढ झाली आहे. साखर कारखान्यांवरील निविदा दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी वाढून ३,६५० रुपये झाले आहेत. याचबरोबर घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयांनी वाढून ४,००० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र, सध्या बाजारात मागणी तुलनेने कमी असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांसाठी जाहीर करण्यात आलेला हा साखर कोटा तुलनेने समतोल मानला जात असला, तरी राज्यातील २०२५–२६ चा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १५ फेब्रुवारीनंतर अनेक जिल्ह्यांतील ऊस गाळप पूर्ण होऊन साखर कारखाने बंद होण्यास सुरुवात होणार आहेत.

मागील दोन महिन्यांत राज्यातील बाजारपेठांमध्ये जीएसटी कर बुडवून विक्री झालेल्या साखरेची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याची जोरदार चर्चा होती. कोट्यातील साखर आणि कर बुडवून आलेल्या साखरेच्या जादा आवकेमुळे मागील काळात साखरेचे दर मंदावले होते. या पार्श्वभूमीवर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अशा मालट्रक्सची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, हंगामात ठोस कारवाई झाल्याचे समोर आले नाही.

आता गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात असल्याने, कारखान्यांकडून जीएसटी बुडवून होणाऱ्या साखर विक्रीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, कारखान्यांना दिलेल्या अधिकृत कोट्यानुसारच साखरेची आवक होणार असल्याने बाजारात पुढील काळात आवक घटण्याची शक्यता आहे. या अपेक्षेमुळेच साखरेच्या निविदा दरांना आधार मिळाला असून, कोटा जाहीर होण्यापूर्वी ३,५५० रुपयांपर्यंत असलेले दर आता ३,६५० रुपयांवर पोहोचले आहेत. १ फेब्रुवारीपासून नव्या निविदा सुरू होताच दरांमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचा प्रतिक्विंटल दर पूर्वी ३,९०० ते ३,९५० रुपये होता, तो वाढून आता ४,००० रुपयांवर पोहोचला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!