---Advertisement---

गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील; महायुतीने बाजी मारली

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापूर, वृत्तसंस्था: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. कोरमअभावी पंधरा दिवसांपूर्वी तहकूब झालेल्या निवडसभेची कोंडी आज, १० नोव्हेंबर रोजी फुटली. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव केला.

गोकुळ दूध संघासाठी १८ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते, तर १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. एकूण २५ जागांपैकी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला १३, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला १२ जागा मिळाल्या होत्या. संचालक मंडळात समविचारी आघाडीचे संख्याबळ अधिक असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराने विजय मिळवला.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांच्या संचालकांसह शासननियुक्त चार सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राज्य सरकारने गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. या निर्णयाला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १० नोव्हेंबर रोजी नियोजित निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन ठेवण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

या पार्श्वभूमीवर आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील यांनी विजय मिळवत गोकुळच्या सत्तेची सूत्रे हाती घेतली. संचालक मंडळात संख्याबळ अधिक असूनही अध्यक्षपदाची निवडणूक गमावल्याने सतेज पाटील यांच्या आघाडीसाठी हा राजकीय धक्का मानला जात आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!