पुणे, वृत्तसंस्था : आधीच वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता दूध दरवाढीचा फटका बसणार आहे. राज्यात गाय आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पुण्यात झालेल्या या बैठकीला राज्यातील ४५ सहकारी आणि खासगी दूध ब्रँडचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, गोकुळ दूध संघानेही दूध दरवाढीचे संकेत दिल्याने ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे.
पुण्यातील कात्रज डेअरीच्या कार्यालयात दूध उत्पादक व व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक पार पडली. यावेळी गाय आणि म्हशीच्या दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
डीलर रेट, बाहेरील दूध ब्रँडची वाढती स्पर्धा, साखर आणि डिझेलच्या दरातील वाढ यामुळे दूध दरवाढ करणे आवश्यक असल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. उत्पादन आणि वितरण खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या दरवाढीबाबतही हालचाली सुरू झाल्या आहेत. गोकुळचे नूतन चेअरमन राजेश पाटील यांनी दूध दरवाढीचे संकेत दिले आहेत. शनिवारी होणाऱ्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोकुळच्या ग्राहकांनाही दूध दरवाढीचा सामना करावा लागू शकतो.
दुसरीकडे, अमूल आणि मदर डेअरीनेही अलीकडेच दूध दरात वाढ केली आहे. अमूलने १२ नोव्हेंबरपासून ताजा टोण्ड दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपये, तर अमूल गोल्डच्या दरात ४ रुपयांची वाढ लागू केली आहे. मदर डेअरीनेही दूध दरात २ ते ४ रुपयांनी वाढ केली आहे.
एकीकडे इंधन, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना आता दूधही महागणार असल्याने सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दररोज आवश्यक असलेल्या दुधाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होणार आहे.











