---Advertisement---

पंढरपुरात विहिरी दुर्घटनेने खळबळ; ढिगार्‍याखाली तिघे अद्याप अडकले !

Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर वृत्तसंस्था : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीचा भराव कोसळून चार मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार मजुरांपैकी एका मजुराचा मृतदेह रात्री उशिरा एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढला असून, अन्य तीन मजुरांचा शोध अद्याप सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री एक वाजता घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. तसेच मृत मजुराच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

नेमकी दुर्घटना कशी घडली?

मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास आंबे गावातील शेतकरी निवास शिंदे यांच्या शेतातील सुमारे ५० फूट खोल विहिरीचे मोजमाप सुरू होते. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर मोजमापासाठी चार मजूर विहिरीत उतरले होते. त्याचवेळी अचानक विहिरीचा भराव कोसळला आणि चारही मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ढिगाऱ्यात मोठमोठे दगड असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा एनडीआरएफच्या पथकाला एका मजुराचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मात्र, उर्वरित तीन मजुरांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरेंची मध्यरात्री घटनास्थळी भेट

या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री सुमारे एक वाजता घटनास्थळी भेट दिली. त्यांनी रात्री उशिरापर्यंत बचावकार्याची पाहणी केली आणि प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मृत मजुराच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुराच्या कुटुंबीयांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे. संबंधित मजुराला पाच मुली आणि एक मुलगा असल्याने त्याच्या कुटुंबाला आणखी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच धोकादायक पद्धतीने आणि विनापरवाना विहीर खोदकाम करण्यात आले होते का, याची सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांची नावे

आबा घोडके – अनवली, ता. पंढरपूर, तानाजी घोडके – अनवली, ता. पंढरपूर,सिद्धू घाडगे – रांजणी, ता. पंढरपूर, मंगेश मोरे – रांजणी, ता. पंढरपूर

दरम्यान, तीन मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असल्याने त्यांच्या शोधासाठी एनडीआरएफचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या दुर्घटनेमुळे आंबे आणि परिसरातील गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!