ठाणे : ठाण्यात भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिल शेख मनसे पदाधिकारी यांचे नाव आहे. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शव विच्छेदनासाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.
या हत्येचं सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले असून त्यात हल्लेखोर जमिल यांना डोक्यात गोळी झाडताना स्पष्ट दिसत आहे. या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलीस दोन संशयिताचा शोध घेत आहेत. जमिल यांची हत्या झाल्याचे कळताच राबोडी परिसरात मोठ्या प्रमाणात मनसैनिक जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या परिसरात लावला होता. जमिल शेख यांची हत्या ही स्थानिक नेत्याने किंवा बिल्डरने केली असल्याचा संशय यावेळी मनसेच्या नेत्यांनी बोलून दाखवला. या हल्ल्यामागचे कारण हे क्लस्टर योजना आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध लावावा, मनसेला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशारा मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.






