अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेतील विषय शिक्षक शरणप्पा फुलारी यांनी महाराष्ट्रातील कन्नड माध्यमाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना उपगोग होण्यासाठी शैक्षणिक माहितीचे ब्लॉग आणि युट्यूब चॅनेल तयार केले असून त्याच्या लोगोचे अनावरण मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोट पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत उपमुख्यकार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, चंचला पाटील, गटविकास अधिकारी भारत एवळे, गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांच्या उपस्थितीत पार पडले.
राज्यातील सोलापूर, सांगली, ठाणे,पुणे, मुंबई,कोल्हापूर जिल्ह्यातील कन्नड शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कोव्हीड काळात शाळा बंद असून शिक्षण मात्र चालू आहे . या उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य , ऑडिओ, व्हिडियो, पीडीएफ, युट्युब व्हिडियो, पाठ्यपुस्तक, फ्लिपबुक्स, विविध वेबसाईट्स, कर्नाटक महाराष्ट्रातील प्रसिद्ध ब्लॉगरचे ब्लॉग्स एका क्लिकमध्ये उपलब्ध होणार आहेत. फुलारी यांनी गेल्या 20 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहे.
लोकसहभागातून शाळासमृद्धी उपक्रम राबवून संपूर्ण महाराष्ट्रात ईलर्निंग सोलर डिजिटल आणि टॅब शाळा करून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. लॉकडाऊन मध्ये गुगल मीट, झूम, मायक्रोसॉफ्ट टिम्स, वाईज अँप द्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, महाराष्ट्रातील सुमारे 557 लोकांना कन्नड भाषा वाचयाला, लिहायला आणि बोलायला ऑनलाईन क्लास, ऑनलाईन वचन गायन, गायन, नृत्य, सामान्यज्ञान स्पर्धा घेऊन परिश्रम गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले आहे .