---Advertisement---

रक्त संकलनातील 10 टक्के रक्त साठा सिव्हील हॉस्पिटलला द्यावा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर,दि.3: जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे रक्त संकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्तसाठा कमी पडत आहे. खाजगी आणि शासकीय ब्लड बँका, स्वयंसेवी संस्था, विद्यापीठ यांनी रक्तसंकलन करून यातील 10 टक्के रक्तसाठा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयाला (सिव्हील हॉस्पिटल) द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी एस.पी. कुलकर्णी, डॉ. सयाजी गायकवाड, डॉ. अबिद पटेल, सुनिता गायकवाड यांच्यासह एआरटीचे सर्व वैद्यकीय अधिकारी, समितीचे सदस्य, सामाजिक संस्था, ब्लड बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एडस संसर्ग रूग्णांचे प्रमाण वाढू नये, यासाठी नियमित तपासण्या करा. सामाजिक संसथांच्या मदतीने तपासण्या वाढवा. एडस रूग्णांवर योग्य उपचार करून औषधे कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. रूग्णांना असलेल्या सोयी-सुविधा देण्यावर भर द्या.

लहान बालकांच्या आहारासाठी निधी
एचआयव्ही संसर्ग बालकांना प्रोटीनयुक्त सकस आहाराची गरज आहे. निधीअभावी आहार मिळत नसल्याची बाब निदर्शनाला आल्यानंतर श्री. शंभरकर यांनी तत्काळ दखल घेत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. बालकांच्या आहारासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गरोदर महिलांची तपासणी
प्रत्येक गरोदर महिलेची एचआयव्ही तपासणी केली जाते. गरोदर महिला एडसग्रस्त आहे हे निदर्शनाला आले तर तिच्यावर त्वरित उपचार सुरू केले जातात. यामुळे बाळाला धोका पोहोचण्याचे प्रमाण कमी होते.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी शिबीर
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना रेशन कार्ड मिळवून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यांची जुनी रेशनकार्ड जमा करून अंत्योदय योजनेतील कार्ड देण्यासाठी शिबीर आयोजित करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी केल्या. तसेच त्यांना अन्य व्यवसायासाठी प्रशिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे.

सामाजिक संस्थांनी वंचितांसाठी पुढाकार घ्यावा
अनेक कुटुंबे शासकीय लाभापासून दूर आहेत. सामाजिक संस्थांनी शासकीय यंत्रणांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी. सामाजिक संस्थांनी मतदान कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड यापासून वंचित राहिलेल्यांना लाभ मिळण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!