ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वबळाचा नारा सोडला : भाजप ‘महायुती’ म्हणून लढणार

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून फारकत घेण्याची भाषा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, भाजपच्या नव्या प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारीच्या उपस्थितीत झालेल्या पहिल्याच कोअर कमिटी बैठकीत महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाण्याचा विचार मांडण्यात आला.
जवळपास चार तास चाललेल्या या बैठकीत प्रभारींनी ‘एकला चलो रे’ची भाषा नको, जिल्हास्तरावरही महायुती म्हणून समन्वय राखत काम करण्याच्या सूचना दिल्या. आगामी विधानसभा निवडणुकांसाठीचा रोडमॅपही शनिवारच्या बैठकीत नक्की करण्यात आला. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य विभागनिहाय दौर करणार असल्याचे समजते.

भाजपचे नवनियुक्त प्रदेश प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी असलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. प्रभारी, सहप्रभारींसह राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह राज्यभरातील महत्त्वाचे ४० नेते बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला असून विधानसभानिहाय सुक्ष्म नियोजनही केले जाणार आहे. या रोडमॅपच्या अंमलबजावणीसाठी लवकरच दुसरी बैठक घेतली जाणार असल्याचे समजते. ‘आगामी निवडणुका भाजप मित्रपक्षांच्या साथीनेच लढविणार असून महायुतीच्या विजयाचा रोडमॅप तयार झाला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व घटकांचे हित साधणारा आहे. सर्वसमावेशक विकासासाठी मांडलेल्या अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारच्या आभिनंदनाचा ठरावही या बैठकीत झाल्याचे आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. लोकसभेनंतर भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गटात निर्माण झालेले तणाव दूर करण्यासाठी आता भाजपकडूनच पुढाकार घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेच्या उमेदवारांची निवड करताना सामाजिक, राजकीय आणि जातीगत समीकरणांचा काटेकोरपणे अभ्यास केला जाणार आहे. लोकसभेतील चुकांची पुनरावृत्ती टाळण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी काही नेत्यांची निवड केली जाणार आहे. १० जुलैपर्यंत राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतील ७०० हून अधिक मंडलांमध्ये सहकारी पक्षांसोबत प्रत्यक्ष जाऊन अर्थसंकल्पाच्या तरतुदींची विस्तृत माहिती जनतेला देण्यासाठी अभियान राबविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!