---Advertisement---

श्री गुरुमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावाने पालखी मिरवणुकीने वेधले लक्ष

By team
On: July 11, 2025 11:05 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री गुरुमंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना आज उत्सवाच्या दिवशी भक्तजनांनी भरभरून प्रतिसाद दिला.

वीणा सप्ताह व भागवत सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी विविध धार्मिक व भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. पहाटे पाच वाजता श्रींचे मंगलस्नान आणि महालघुरुद्राभिषेक करण्यात आले. त्यानंतर श्रींच्या पादुकांची पालखी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी शिवपुरी येथील ‘विश्व फाउंडेशन’चे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, डॉ. गिरीजा राजीमवाले, कु. देव व कुमारी देवयानी राजीमवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. परिक्रमेनंतर डॉ. राजीमवाले परिवाराने सर्व भाविकांच्यावतीने श्रींचे विधिपूर्वक गुरुपूजन केले. पालखी मिरवणुकी दरम्यान ओंकार जाजू यांनी दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

रोज सायंकाळी कोल्हापूर येथील श्री संकेत काणे महाराज यांचे प्रभावी कीर्तन झाले. त्याचबरोबर सोलापूर येथील नंदकुमार जोशी यांच्या सुश्राव्य भागवत कथांनीही भाविकांना अध्यात्मिक आनंद दिला. हा संपूर्ण धार्मिक सोहळा दिनांक ४ ते १० जुलै या कालावधीत संपन्न झाला.

मठाच्या वतीने दररोज भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भाविकांची देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विद्याधर पारखे, भूपतभाई वोरा, वक्रतुंड औरंगाबादकर, पवन कुलकर्णी, नितीन शिंदे, श्रेणीक पंडित, आनंद कुंभार, विशाल अनगले, परमेश्वर माळी, सुरेंद्र तेलंग यांच्यासह अनेक सेवेकऱ्यांनी अपार मेहनत घेतली.

भाविकांची अलोट गर्दी

दरवर्षीप्रमाणे बाळप्पा महाराज मठात गुरुपौर्णिमा सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या धार्मिक परंपरेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!