अक्कलकोट, मारुती बावडे : आयुष्यभर केलेली धडपड, पक्षासाठी घेतलेले कष्ट आणि
नेतृत्वाने दाखवलेला विश्वास जेव्हा विजयाच्या रूपाने समोर येतो, तेव्हा त्या आनंदाला शब्दही अपुरे पडतात. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून येताच राजेंद्र बंदीछोडे यांच्या बाबतीत असाच भावनिक प्रसंग घडला. विजयाची बातमी समजताच त्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी फोनवर संवाद साधला. बोलताना त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे अश्रू
केवळ विजयाचे नव्हते, तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वाने दिलेल्या विश्वासाचे आणि मिळालेल्या संधीचे सार्थक झाल्याची भावना नूतन संचालक बंदीछोडे यांनी व्यक्त केले.
राजेंद्र बंदीछोडे यांनी १ हजार २९२ मते मिळवत मोहिते-पाटील गटाचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव केला. अनेक वर्षे सरपंचपद भूषविल्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले. तसेच बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. एक वेळा त्यांचा पंचायत समिती निवडणुकीत पराभव देखील झाला आहे परंतु ते खचता पक्षासोबत प्रामाणिक राहिले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे
खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हा बँकेसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या संचालकपदाची संधी दिली.
विजयानंतर त्यांनी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांची आवर्जून गळाभेट घेतली. अनेक वर्षांच्या राजकीय प्रवासातील संघर्ष, कार्यकर्त्यांची साथ आणि नेतृत्वाने दिलेली संधी या सगळ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. राजकारणात मोठ्या पदावर पोहोचणे ही केवळ व्यक्तीची उपलब्धी नसते, तर त्या व्यक्तीच्या मागे उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि कुटुंबाच्या स्वप्नांचीही पूर्तता असते, याची जाणीव या प्रसंगातून झाली.
भाजपमध्ये कार्यकर्त्याला मोठे स्थान
बंदीछोडे यांच्या विजयातून पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेतृत्वाने विश्वासाने मोठ्या जबाबदारीची संधी दिली. कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा आधार असून, कार्यकर्त्याच्या कष्टांमुळेच पक्षाची ताकद वाढते, ही भावना या निकालातून व्यक्त होत आहे.
सचिन कल्याणशेट्टी,आमदार









