मुंबई वृत्तसंस्था – मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आयपीएलच्या आगामी विसाव्या हंगामासाठी रोहित शर्माच्या नावाची अधिकृत घोषणा फ्रँचायझीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, रोहितच्या पुनरागमनावर संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनीही खास प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रोहितकडे संघाची धुरा सोपवण्यात आल्याने चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या निर्णयानंतर नीता अंबानी यांनी रोहितच्या प्रवासाचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.
नीता अंबानी म्हणाल्या की, रोहित शर्मा युवा खेळाडू असतानाच मुंबई इंडियन्सशी जोडला गेला होता. २०११ मध्ये सर्वप्रथम त्याच्यासाठी बोली लावण्यात आली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स परिवाराचा अविभाज्य भाग आहे. गेल्या अनेक वर्षांत रोहितने क्रिकेटपटू, चॅम्पियन आणि नेतृत्वकर्ता म्हणून स्वतःमध्ये मोठी प्रगती केली आहे. त्याचबरोबर एक उत्तम कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून घडताना पाहणेही आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना नीता अंबानी म्हणाल्या की, रोहित शर्माला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना पाहणे हा आमच्यासाठी अत्यंत खास क्षण आहे. त्याने गेल्या काही वर्षांत संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. तो मुंबई इंडियन्ससाठी किती महत्त्वाचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे.
रोहितचा हा नवा प्रवास त्याच्यासाठी, संघासाठी आणि मुंबई इंडियन्सवर प्रेम करणाऱ्या लाखो चाहत्यांसाठी अभिमानाचे आणखी मोठे क्षण घेऊन येईल, असा विश्वासही नीता अंबानी यांनी व्यक्त केला. तसेच रोहितला नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.
आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आगामी हंगामात कशी कामगिरी करणार आणि पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.











