---Advertisement---

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ !

By team
On: July 16, 2025 4:58 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. यानिमित्त आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. अंबादास दानवे ऑगस्ट 2019 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडून आले होते.

शिवसेनेतील फूटीनंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असला तरी चालू आठवड्यात अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने आजच त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

अंबादास दानवे हे शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. अलीकडच्या काळात ठाकरे गटाची भूमिका ठाम आणि जोरकसपणे मांडणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. आता ते विधान परिषदेचे सदस्य राहणार नसल्यामुळे, आगामी काळात ठाकरे गटाला त्यांच्या सारख्या आक्रमक नेत्याची कमतरता भासू शकते.

अंबादस दानवे यांचा विधानपरिषदेतील आमदारकीचा काळ संपुष्टात येणार असल्याने आता पुन्हा ते सभागृहात दिसणार की नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सद्यस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर पुन्हा आमदार म्हणून निवडून येणे शक्य आहे का, यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे यांना पुन्हा त्याच जागेवर निवडून येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच संबंधित विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तोपर्यंत अंबादास दानवे यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या काही जागांचा कार्यकाळ 2026 मध्ये पूर्ण होणार आहे. मात्र, जर विधानसभा सदस्यांमार्फत निवडून येण्याचा पर्याय विचारात घेतला, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 20 आमदारांचे संख्याबळ असल्यामुळे तो मार्ग कठीण आहे. विधान परिषदेसाठी आवश्यक असलेल्या 40 ते 45 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय ही निवडणूक शक्य नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांना पुन्हा विधान परिषदेवर येण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!