मुंबई : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवाईदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना धमकावल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यात अजित पवार ही अंजली कृष्णा यांना तंबी देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून हे अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचे नाव बाबा जगताप असून, ते संरपच असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता हा व्यक्ती ग्राम पंचायत कार्यालयात गांजा सेवन करत असल्याचा दावा शिवसेनेच्या (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच. याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं. दादाच्या आमदाराने थेट अधिकाऱ्याची कागदपत्र तपासायला मागितली. ७० कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे मागितली, तर… अधिकारी कदाचित कागदपत्र सादर करेल ही. पण 70,000 कोटीच्या घोटाळ्याची कागदपत्र महाराष्ट्राने मागितली तर दादा सोडा फडणवीसांना तरी तोंड दाखवायला जागा राहील का ? किरीटचं वस्त्रहरण तर आधीच झालेलं आहे”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना डिवचलं.
“जिथे लोकांना मंत्रालयाचे महिनो न् महिने खेटे घालावे लागतात अन् तरीही ही सरकार भेटत नाही. तिथे अशा गांजा फुकणाऱ्या नशेडी लोकांना डायरेक्ट फोनवर ऍक्सेस आहे”, अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर केली आहे.






