---Advertisement---

मान्सूनचा अंदाज आता अधिक अचूक! ८४ वर्षांच्या अभ्यासातून नवी पद्धत विकसित

Follow Us:
---Advertisement---

भारत हा शेतीप्रधान देश असल्याने मान्सूनचा अचूक अंदाज शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पावसाचे आगमन, त्याचा कालावधी आणि विविध भागांतील पावसाचे प्रमाण यावर शेतीचे नियोजन अवलंबून असते. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्ष पावसात अनेकदा फरक दिसून येतो. ही तफावत कमी करण्यासाठी आयआयटी मद्रास आणि गुवाहाटी विद्यापीठातील संशोधकांनी मान्सूनचे आगमन ओळखण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. यासाठी गेल्या ८४ वर्षांतील पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे.

या संशोधनामुळे एखाद्या भागात झालेला पहिला पाऊस आणि प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन यातील फरक स्पष्टपणे ओळखता येणार आहे. संशोधकांनी हवामान नेटवर्क आणि जटिल प्रणालींच्या सिद्धांताचा वापर करून ही पद्धत विकसित केली आहे. एखाद्या ठिकाणी पाऊस सुरू झाला म्हणजे मान्सून दाखल झाला, असे मानले जाणार नाही. त्याऐवजी विविध भागांतील पावसाचे छोटे समूह एकमेकांशी जोडले जाऊन मोठा समूह तयार होतो का, याचा अभ्यास केला जाणार आहे. हा समूह विस्तारत उत्तरेकडे सरकू लागला की मान्सूनचे आगमन झाल्याचे निश्चित करता येईल.

या अभ्यासानुसार, ईशान्य भारतात साधारण १५ मेच्या आसपास मान्सूनच्या मोठ्या हालचाली सुरू होतात, तर द्वीपकल्पीय भारतात ही प्रक्रिया साधारण ९ जूनच्या आसपास दिसून येते. एप्रिलमध्ये ईशान्य भारतातील काही भागांत पावसाचे छोटे समूह तयार होतात. पुढे हे समूह बंगालच्या उपसागरातील पावसाच्या समूहाशी जोडले जातात. त्यानंतर केरळमधील मान्सूनचा समूहही या मोठ्या समूहाचा भाग बनतो.

आयआयटी मद्रासचे प्राध्यापक आर. आय. सुजीत यांच्या मते, या नव्या पद्धतीमुळे मान्सूनच्या चुकीच्या सुरुवातीचा अंदाज टाळण्यास मदत होऊ शकते. परिणामी शेतकऱ्यांना पेरणीची योग्य वेळ ठरवणे शक्य होईल. तसेच सरकारला पाणी साठवण, जलव्यवस्थापन आणि पूरस्थितीचा सामना करण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करता येईल. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ क्लायमेट’ या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!