---Advertisement---

भाऊबीज संपताच अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दिवाळीतील भाऊबीजेचा उत्सव संपताच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी लाट उसळली आहे. सलग सुट्ट्यांचा आनंद घेत पुणे, मुंबई, नाशिक, नगर यांसह
राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होत आहेत. त्यात गुरुवार असल्याने दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या आणखी वाढली आहे.

स्वामी समर्थ महिन्याचे धार्मिक महत्त्व आणि गुरुवारचा दर्शनयोग यामुळे मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीचा परिणाम आता शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर स्पष्टपणे जाणवू लागला आहे.

शहरातील प्रमुख चौक, मंदिराकडे जाणारे रस्ते आणि बाजारपेठ परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अनेक ठिकाणी वाहने अडकून पडत असल्याने स्थानिक नागरिक, दुकानदार तसेच दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावले असले, तरी केवळ बॅरिकेड्सच्या व्यवस्थेमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते आणि वाहनचालकांकडून होत असलेली गर्दीतून मार्ग काढण्याची धडपड यामुळे वाहतुकीची कोंडी जैसे थे राहण्याचे चित्र आहे.

भाविकांची संख्या लक्षात घेता पोलिस प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजनांपलीकडे जाऊन स्वतंत्र वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी निश्चित मार्ग, मंदिर परिसरात वाहनांना प्रतिबंध, बाहेरील भागात वाहनतळाची व्यवस्था आणि गर्दीच्या वेळेत एकेरी वाहतूक लागू करणे अशा उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. प्रमुख चौकांमध्ये अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करून वाहतूक वळविण्याची जबाबदारी निश्चित करावी. तसेच स्वयंसेवकांची मदत, दिशादर्शक फलक आणि ध्वनिक्षेपकाद्वारे सूचना देऊन भाविकांना पर्यायी मार्गांची माहिती द्यावी. आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग
मोकळा ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

अक्कलकोट हे राज्यभरातील स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान असल्याने सणासुदीच्या काळात आणि गुरुवारी भाविकांची गर्दी वाढणे स्वाभाविक आहे. मात्र, या गर्दीचे नियोजन वेळीच झाले नाही तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह शहरवासीयांनाही त्याचा मोठा फटका बसू शकतो. सध्या दिसणारी वाहतूक कोंडी ही केवळ एखाद्या दिवसापुरती
समस्या न राहता आगामी काळातील गर्दीच्या व्यवस्थापनाचा इशारा मानण्याची गरज आहे. भाविकांची श्रद्धा आणि शहरातील नागरिकांची दैनंदिन वाहतूक या दोन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस व्यवस्था उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!