ठाणे, वृत्तसंस्था : सायबर गुन्हेगारांनी थेट ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (ता. १७) सायंकाळी उघडकीस आला. हॅकर्सनी त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर तब्बल २० अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे ठाणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आयुक्तांचेच अकाउंट हॅक झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलीस आयुक्त डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर अचानक अश्लील चित्रफिती दिसू लागल्या. त्यांच्या नावाने या चित्रफिती प्रसारित होत असल्याने काही मिनिटांतच हा प्रकार अनेकांच्या निदर्शनास आला. अवघ्या काही वेळात सुमारे २० व्हिडीओ स्टेटसवर शेअर करण्यात आल्याची माहिती आहे.
हा प्रकार लक्षात येताच काही पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने आयुक्तांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. मात्र, स्टेटसवर अश्लील चित्रफिती प्रसारित होण्याचा प्रकार सुरूच असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत हॅक झालेले व्हॉट्सॲप अकाउंट पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. पोलीस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचेच सोशल मीडिया अकाउंट सायबर गुन्हेगारांनी लक्ष्य केल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. अकाउंट हॅक करण्यामागे नेमके कोण आहे, हॅकर्सनी कोणत्या पद्धतीचा वापर केला आणि या प्रकारामागील उद्देश काय होता, याचा तपास सायबर पथकाकडून केला जात आहे.











