सांगोला : वृत्तसंस्था
टाटा विस्टा कार व मोटारसायकलची समोरासमोर जोराची धडक होऊन दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार दि. २ जून रोजी रात्रौ ८.४५ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील बामणी गावाजवळ झाली. मृत तिघेही (रा. निपाणी, ता.चिकोडी, जिल्हा बेळगांव, कर्नाटक) येथील आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, कर्नाटक राज्यातील निपाणी गावचे तिघेजण एकाच दुचाकीवर रविवार दि. २ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने जात होते. यावेळी रात्रौ ८.४५ च्या दरम्यान मांजरी व बामणी दरम्यान असलेल्या ओढ्यावर असलेल्या पुलाजवळ आले असता समोरून येणाऱ्या टाटा विस्टा कार क्र. एम.एच. ४२/ एच. ७९९५ या चार चाकी गाडीने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मोटरसायकल वरील धिरू कोळेकर, माळाप्पा धनगर, विठ्ठल दिवटे (रा. निपाणी, ता.चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) हे तिघे ही जागीच ठार झाले आहेत. या तिघांनाही ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे शवविच्छेदन गृहांमध्ये ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.






