मुंबई, वृत्तसंस्था : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काचे घर मिळावे, यासाठी म्हाडाकडून विविध योजनांच्या माध्यमातून घरांची सोडत काढली जाते. मात्र, मुंबईतील अँटॉप हिल परिसरातील म्हाडाच्या ११० सदनिकांबाबत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. या सदनिका बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा दावा त्यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोमय्या यांच्या दाव्यानुसार, म्हाडाच्या अल्प उत्पन्न गट (LIG) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या ११० सदनिका बांगलादेशी नागरिकांच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे, या घरांसाठी अर्ज हिंदू व्यक्तींच्या नावाने करण्यात आले होते. मात्र, सदनिकांचे मुखत्यारपत्रधारक (पॉवर ऑफ अटर्नी) आणि प्रत्यक्ष लाभार्थी बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात पुराव्यांसह म्हाडा आणि संबंधित मंत्र्यांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.
म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
अँटॉप हिल आणि नुराबाजार परिसरातील ५० हून अधिक रहिवाशांनी मुलुंड पूर्व येथील नीलम नगरमधील आपल्या कार्यालयात भेट घेऊन समस्या मांडल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. सदनिकांमधील अतिक्रमण, कथित बेनामी व्यवहार आणि गुंडगिरीमुळे रहिवासी त्रस्त असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात म्हाडाचे काही अधिकारी आणि एजंट यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
याप्रकरणी सोमय्या यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोईर यांना पत्र लिहून तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, येत्या १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता अँटॉप हिल परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, म्हाडाच्या घरांबाबत करण्यात आलेल्या या आरोपांमुळे मुंबईतील गृहनिर्माण व्यवस्थेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या आरोपांची अधिकृत चौकशी होऊन नेमके सत्य समोर येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









